मराठी भाषेचे महत्व

मराठी भाषा म्हणजेच जसं वळवेल तशी वळणारी भाषा! अस म्हणतात जे मराठी भाषा बोलतात ते खरच भाग्यवान आहेत.मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान! अतिशय सुंदर, गोड आणि आवाजात जोश आणणारी ही भाषा. अतिशय जुनी आणि प्राचीन अशी या भाषेची परंपरा. मराठी भाषेची वाटचाल ही अखंड आणि उज्वल आहे.

संत ज्ञानेश्वर म्हणतात, “माझी मायबोली कशी? तर अमृतलाही पैजेवर जिंकणारी!” सर्व संत कवींनी मराठी भाषेला त्यांच्या भक्तिभावाने सजवले. ओवी अभंगाची लयलूट केली आणि भाषेचा देव्हारा आत्मतेजने उजलून टाकला.

मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. १३ व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला. त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच  हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. मुकुंदराज हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध कवी होते, त्यांनी “विवेक-सिद्धी” आणि “परममित्र ” ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी त्या वेळी सुमारे ३००० अभंग लिहिले आणि भाषेचे महत्व अजुन वाढले.

संस्कृत भाषेने मराठी भाषेला शब्द भांडार दिले आणि अधिक समृद्ध केले.संतकवी नंतर आलेल्या पंडित कवींनी संस्कृत भाषेतील कथा काव्यसंग्रहातून अख्यान काव्याचा खजिना भरून टाकला. पुढे जाऊन शूर शाहिरांनी पोवाडे , लावण्या रचून वीर आणि शृंगार रसांची उधळण केली.

अशी ही मराठी भाषा उदयास आली. मराठी ही राजभाषा म्हणून समजली जाते. आपण १ मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा मान अजुन वाढवला. त्यांनी मराठी बोलीस जास्त महत्त्व दिले.

आज मराठी भाषेला किती महत्त्व राहिले आहे?

आज आपण पहिले तर मराठी भाषेच्या डोक्यावर रजमाण्यतेचा मुकुट आणि अंगावरची वस्त्रे मात्र फाटकी राहिली आहेत. गेल्या ५० वर्षात या भाषेचे स्वरूप धेडगुजरी असे झाले आहे. सगळीकडे पावलोपावली इंग्रजी भाषेचा वापर जास्त केला जातं आहे. ज्या इंग्रजांनी आपल्यावर एवढे वर्ष वर्चस्व गाजवल आज त्यांच्याच भाषेला आपण जास्त महत्त्व देत आहोत. मग ऑफिस असो अथवा रोजचे व्यवहार असो सुपुत्रांना या भाषेचा वापर करताना एवढी लाज कसली वाटतं आहे?

आपल मुल चांगलं शिकावं म्हणून त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जातं. मग त्याच इंग्रजी चांगलं व्हावं म्हणून त्याच्यासोबत घरात इंग्रजी बोलल जात. इंग्रजी भाषेचा इतका मारा  असताना मराठी भाषा शिकण्याची अपेक्षा कशी ठेवली जाते? इंग्रजी लिहिता वाचता नाही आलं तर पुढे जाऊन नोकरी मिळणार नाही अशी लाजिरवाणी अवस्था आज समाजात आहे.इंग्रजी आल म्हणजे अती हुशार अथवा उच्चभृ  समजल जात. मग मराठी भाषा येणारा हुशार नसेल का? कारण आज आपणच या संकल्पना तयार केल्या आहेत.

       एखाद्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर त्याला कमी लेखलं जात.त्याला कमी किंमत दिली जाते.म्हणजे इथे माणसाची गुणवत्ता ही त्याच्या बोलीभाषेवरून ठरवली जाते, आणि हीच कारणे आहेत की, आज आपली मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली आहे.

         जी आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे ,मायभूमी आहे तेथे जन्माला आलेली ही आपली मराठी मायबोली! मग अशी पवित्र असलेली भाषा बोलताना भिती कसली वाटते आपल्याला? आपण पाहतो जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये आपण नोकरी करण्यासाठी अर्ज भरतो तेव्हा नेहमी पहिला प्रश्न असतो इंग्रजी बोलता येत का? इंग्रजी लिखाण चांगलं आहे का? मग मराठी, हिंदी या भाषा येत असतील तर कंपनी च काम थांबेल का? की ज्ञान कितीही असुदे पण इंग्रजी आलच पाहिजे असं ठरवणं अतिशय लज्जास्पद आहे.

आज मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. इंग्रजी शाळांची वाढती संख्या, भरमसाठ फी आणि एडमिशन ची घाई यामुळे मराठी भाषा अजुन मागे पडते की काय याची चिंता वाढली आहे.

मराठी आलीच पाहिजे!

तुम्ही आज जर महाराष्ट्रात राहत असाल आणि तुम्हाला मराठी येत नसेल तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी आपण जन्म घेतला, जेथे महापुरुषांनी मराठी भाषेला घडवलं, वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या मराठी भाषेचा सन्मान हा आपण केलाच पाहिजे.आपण जन्म घेतो तेव्हा पहिला शब्द आई बाबा म्हणतो, म्हणजे आईच्या पोटात असतानाच आपल्या कानात मराठी भाषेचे शब्द रुजलेले असतात.आपल्याला बोलायला शिकवणारी अशी ही मराठी भाषा.

       आपण वेगळे वेगळे सण उत्सव साजरे करतो.आपली मराठी संस्कृती ही सगळ्यात सुंदर संस्कृती समजली जाते.मराठी साज शृंगार, मराठी बाणा म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे. मराठी भाषा संस्काराचे अतिशय सुंदर धडे देत असते. मराठी भाषेतील शब्द भांडार अतिशय सुंदर, सहज बोलता येईल आणि समजेल असे आहे. म्हणजे मराठी भाषा बोलणारा कोणतीही भाषा लवकर शिकतो. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी अस मराठी लोकांना समजल जात.

 मराठी भाषा सगळ्यात श्रीमंत भाषा समजली जाते.मराठी भाषेत अनेक प्रकारचे साहित्य लिहिले गेले आहे.मराठी भाषेतील काव्य, कथा, कादंबरी, उखाणे, चित्रपट अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आहेत. मराठी भाषेत असणारे कोणतेही साहित्य आपल्याला भाषेवर प्रेम करायला भाग पाडते. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील अनेक पुस्तके जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेची पोहोच जगभरात आहे. प्रेम, जिव्हाळा , आपुलकी या सगळ्यांचच एकत्र मिश्रण म्हणजे आपली मराठी मायबोली. अगदी गोड स्वरात बोलली जाते ती आपली मायबोली!

पण आज याच मराठी भाषेचे महत्त्व कमी होत आहे. इंग्रजी भाषेचा हट्ट जास्त धरला जात आहे. भविष्यात या मराठी भाषा नामशेष होऊ नये यासाठी आपण सर्वांनी मिळून भाषेचे जतन केले पाहिजे.

 मराठीचे सुंदर, शुद्ध, तरल स्वरूप चिरंतन करण्यासाठी दत्तो वामन पोतदार यांनी सांगितलेला ” मराठीचा कर्म योग” सर्वांनी स्वीकारला पाहिजे. मी कोठेही स्वाक्षरी करीन ती शुद्ध मराठीच, असा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे. दोन मराठी माणसे एकत्र आली की त्यांनी, तसेच घरात लहानपणापासून मराठीत संवाद साधला पाहिजे. आपल्या शहरातील इतर भाषिकांना ही आपल्या मराठीच्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजे. फक्त अमृतालाही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मातृभाषेचा, मराठी भाषेचा विचार कधीही पडून नाही दिला पाहिजे. आपल्या साहित्यावर प्रेम करणे, आदर करणे आणि त्याची जपणूक करणे हे आपल्या च हातात आहे.आपल्या महाराष्ट्राचं वैभव जपण आपल्याच हातात आहे.

         म्हणूनच, मराठी भाषेचा त्याच्या जपणुकीचा प्रसार झालाच पाहिजे आणि मराठी भाषेचे बीज आपण पेरले पाहिजे.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं,

              “आमच्या महाराष्ट्राची शान आमची भाषा  मराठी,मायभूमीची लाडकी भाषा अमुची मराठी”

              मराठी बोलूया! मराठी जपुया !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *