माझी आई

‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही,
म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आ, ई..!”

हे खोटे नाही.आपल्याला या सुंदर जगात घेऊन येते ती आई! आपल्याला लहानांचे मोठे करते ती आई! अथांग मायेचा सागर म्हणजे आपली आई! बोलायला शिकलो की पहिला शब्द येतो तो म्हणजे आई! आई म्हणजे देवाचं दुसर रूप.

असं म्हणतात की देव स्वतःला या जगात घेऊन येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले.  आई आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते. कोणत्याही व्क्तीगत फायदयाची जाणीव न ठेवता अहोरात आपल्या सेवेत आई सदैव असते .

आई लेकराची माय असते. वासराची गाय असते.दुधावरची साय असते. लांगड्याचा पाय असते.धरणीची ठाय असते.आई आपल्या जन्मभराची शिदोरी असते.आईच्या नजरेतून पाहिल्या वेळी जगाला पहिले. त्याच प्रेमळ नजरेने आजही मी पाहते.

माझ्या आईने च मला प्रेम, माया, ममता , करुणा या सर्व गोष्टी शिकवल्या. जी भाषा कोणत्याच शाळेत शिकवली जात नाही ती प्रेमाची भाषा मला माझ्या आईने शिकवली.

माझी आई मला खूप खूप आवडते.माझ्या आईचे नाव शारदा आहे.माझी आई फक्त माझी आईच नव्हे तर माझी खास मैत्रीण आहे. माझी आई कायम माझ्या सुख दुःखात सोबत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते.जेवण बनवते.

मग मला आणि माझ्या भावाला उठवते.माझा भाऊ लहान आहे.माझ्या आईला माझ्या भावाचे सगळे काही अवरावे लागते.मग आमच्या दोघांना शाळेत जाण्यासाठी तयार करते.घरात कधी दुःखाचा डोंगर कोसळला व सुखाचा वर्षाव होत असेल नेहमी आईची आठवण येत असते.

आईला स्वच्छता करायला खूप आवडते.आई रोजच्या रोज घर नीट आवरते.दररोज आमच्यासाठी नव नवीन चविष्ट पदार्थ बनवते.

आमच्या आवडी- निवडी ,पसंत नापसंत तिला सर्व  काही माहिती आहे.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सतत काहीना काहीतरी काम करत असतें.तिला कधी कंटाळा आला असेल तर ती कधीच दाखवत नाही नेहमी तिच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह असतो.तिला थकवा म्हणजे काय हे जणू माहितीच नाही! 

एकदा मला ताप आला असताना आईची रात्रीची झोप उडाली होती.कधी देवाजवळ माझ्यासाठी प्रार्थना करायची तर कधी मी ठीक होईल याची सतत काळजी, आणि आस देवाजवळ धरायची.

कवी म्हणतात, 

मंदिराचा उंच कळस म्हणजे माझी आई,
अंगणातील पवित्र तुळस म्हणजे माझी आई,
भजनात गूनगुनावी अशी संतवाणी म्हणजे माझी आई,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी म्हणजे माझी आई!

जसा वटवृक्ष उन पाऊस झेलून आपल्याला आसरा देतो तशी आई सगळी दुखः झेलून आपल्याला सुख देते. तिच्या पदराआड आपल्याला घेते.आपल्याला जपते. सण आला किवा माझा वाढदिवस आला की माझ्यासाठी खेळणी,नवनवीन कपडे, पुस्तके जे मला आवडेल व ज्याचा माझ्या भविष्यात मला त्या वस्तूंचा उपयोग होईल असे काहीतरी आणते.

माझी आई खूप छान अंगाई गाते.तसेच तिला संगीताची खूप आवड आहे.ती वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात जाऊन गाते.सगळे लोक तिचे खूप कौतुक करतात. रात्री झोपताना माझी आई रोज एक गोष्ट सांगते. अंगाई गाते. हे सगळं ऐकता ऐकता कधी झोप लागते समजतच नाही. माझ्या आईमुळे मला खूप चांगल्या चांगल्या सवयी लागल्या आहेत.

माझी आई मला नेहमी सांगते दुसऱ्यांना मदत करावी.खोटे बोलू नये.चोरी करू नये. सर्वांसोबत प्रेमाने वागावे.माझी आई नेहमी संस्काराचे धडे देत असते.कधी मी चुकले तर मला मारत नाही पण छान समजावून सांगते.

आई म्हणजे आपला गुरु आहे.सौख्याचा सागर आहे.मांगल्याचे सार आहे.अमृताची धार आहे.प्रितीचे माहेर आहे.माझी आई माझा कल्पतरू आहे. माझी आई सामान्य असूनही असामान्य आहे.

माझ्या आईला नेहमी वाटते की फक्त अभ्यासच नाही तर सगळ्या कला आल्या पाहिजेत.त्यामुळे आईने मला खूप गोष्टी लहानपणापासून शिकवल्या. मला आज आईमुळे चित्रकला, संगीत कला, नाट्य, नृत्य खूप छान जमते.माझ्या शाळेत वेगळ्या वेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.

त्या मध्ये मी नेहमी भाग घेते.माझ्या आईची इच्छा असते की मी चांगल्या प्रकारे सर्व करावे.म्हणून मला ती सर्व काही शिकवते.मदत करते.पण तिची इच्छा असते की मी सर्व काही स्वतः करावे.

अशा प्रकारे मला घडवायला आईने खूप हातभार लावला.

ते म्हणतात ना , “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!”आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत.पण या शब्दात नभा एवढे सामर्थ्य आहे.आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते.सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे.खरच माझ्या आईची महती सांगायला माझे शब्द भांडार कमी पडते.आईची माया, ममता सगळ्यात थोर आहे.

माझी आई माझी माऊली आहे.तिचे जन्मभराचे ऋण आहेत.आणि त्या शिवाय जीवनास कोणतेच सार नाही.माझ्या आईसारखे कौतुके बोल नाहीत.तिच्या यातनांना या जगी तोड नाही.खरच आईशिवाय या जगात कशालाच मोल नाही.

ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते. वेळेचे महत्त्व समजावून सांगते असे म्हणतात कि आई प्रत्येकालच्या आयुष्यात एक वरदान आहे. जिच्या आशीर्वादाने आपण घडतो  मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि मला जगातील सर्वोत्कृष्ट आई दिली याबद्दल देवाचे आभार मानते.

अशी माझी आई मला खूप आवडते. माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. मी माझ्या आईशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *