कोरोना आणि माणुसकी

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात दंग असताना कोरोना नावाचा विषाणू आला. अगदी साधं,सोप जीवन जगणारे  गरीब लोक असो अथवा आरामात जगणारे श्रीमंत लोक असो, कोरोनाने सगळ्यांचं आयुष्य जागेवर ठप्प केलं.

कोरोनाने केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात हाहाकार केला.नाही नाही म्हणता म्हणता सगळीकडे हा कोरोना पोहोचला.

भारत सरकारनेही उपाययोजना म्हणून लॉकडाऊन जाहीर केला.मग काय सगळे घरातच! सुरुवातीला कमी प्रमाणात पसरलेला कोरोना पुढे जाऊन आपल आयुष्यच बदलेल असं कोणालाच वाटलं नव्हत.

           आज आपण पाहिलं तर संपूर्ण भारतात ,०७४,७०२ इतके कोरोना बाधित आहेत. एवढेच नव्हे तर ९५,५७४ एवढे मृत्यू झालेले आहेत. कोरोना केवळ शहरात नाही पण त्याचबरोबर छोट्या गावात, पाड्यात,वाड्यात जाऊन पोहोचला आहे.

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे हे जेव्हा समजले तेव्हा मग सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे हे उपाय होते.

लोक सामाजिक अंतर तर राखत होते पण हे अंतर राखताना एकमेकांच्या मनाशी अंतर राखत आहे याची जाणीव होत नव्हती.

              कोरोना सोबत लढण जितकं महत्वाचं आहे तितकच एकमेकांना मानसिक बळ,साथ देणं महत्त्वाचं आहे.कारण, आजार हा ९०% मानसिक आणि १०% शारिरीक आहे.

कोरोनासोबत लढताना  आपण माणुसकी जपतोय का?

      खरच…! हा विचार करताना डोळ्यासमोर हजारो उदाहरणे येतात.पूर्वी जेव्हा गणपती उत्सव साजरा केला जायचा तेव्हा शहरातून हजारो लोक आपल्या कुटुंबासोत गावाकडे जायचे.लोक एकत्र यायचे. उत्सव साजरा करायचे. पण जसा कोरोना आला तस गावाकडील लोकांनी गावाच्या सीमा बंद केल्या. जरी कोणाला कोरोना नसेल तरी लोकांचं येणं बंद केलं गेलं.मग हे कितपत योग्य आहे? माणसाने माणसाशी माणसासारखे नाही वागले तर मग कोण वागेल?एखद्या व्यक्तीला अचानक घरी त्रास होऊ लागतो. त्याच्या घरचे रस्त्यावर येऊन मदत मागतात.

डोळ्यात गच्च पाणी भरलेले असते. मनात भिती. गळ्यातून निघणारे मदतीसाठी चे आवाज. पण तरीही आपल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून लोक गमीजमती चालू आहेत असे बघतात.ज्या कुटुंबावर अशी वेळ आली असेल त्यांना कसं वाटतं असेल? त्याच्या भावनांचा खेळ खंडोबा होताना बघून आपल्याला काय मिळतं?

अशी अनेक उदाहरणे आहेत. कोरोना झाला म्हणून घरं वाळीत टाकण्यात येतात.मग त्या लोकांकडे कोणी बघत सुद्धा नाही.मग अशा वेळी वेळेला धावून जाणारा तर खूप लांब!कुठे चालली ही माणुसकी?कुठे गेला जिव्हाळा?

           याच कोरोना काळामध्ये असेपण लोक आहे ज्यांनी माणुसकी ची मशाल कायम ठेवली. पोलीस, डॉक्टर,सरकारी कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा करता दिवस रात्र रुग्णांची सेवा केली. त्यांना योग्य ते उपचार दिले. पोलिसांनी अहोरात्र कष्ट करून योग्य ते उपाय केले. लोकांना वेळीच समज दिली. मग या सगळ्यांना नव्हता का त्यांचा जीव?त्यांचं कुटुंब? पण त्यांनी या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा माणुसकी चे कर्तव्य चोखपणे बजावले.

माणुसकी म्हणजे काय?

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात, माणुसकी म्हणजे माया, माणुसकी म्हणजे आपुलकी, माणुसकी म्हणजे जिव्हाळा, माणुसकी म्हणजे स्वर्गसुख

कोरोना काळात माणुसकी का महत्वाची आहे?

आपण लोकांना प्रेम दिल्याने त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण होते जी त्यांना लढायला मदत करते.

कोरोना झालेल्या व्यक्तीला समजून घेऊन त्याला मनोबल दिले तर त्याला आपण या लढाई मध्ये एकटे आहोत असे वाटणार नाही.

गरज लागल्यास एखाद्या कुटुंबाला मदत केल्याने त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊ शकते.

आपला एक विश्वासाचा आणि मदतीचा हात कोणाचे तरी आयुष्य सुंदर बनवू शकते.

कोरोना झालेल्या व्यक्तीला वाळीत टाकता त्या व्यक्तीचा आदर केला तर ती व्यक्ती ही लढाई लवकर जिंकू शकते.

         आपल्याला माहीतच आहे, प्रेम,दया, करुणा  कठीण परिस्थितीवर मात करून आयुष्य अधिक सुंदर बनवतात.आपल्याला माणुसकीची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे.कारण, आज जी वेळ बाकी लोकांवर येत आहे,ती आपल्यावर सुद्धा येऊ शकते.माणुसकीने आपण माणसं जोडतो. तीच माणसं आपल्या कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात.माणुसकी हा एक धर्म आहे.हा धर्म निभावणं म्हणजे स्वर्गसुख अनुभवण्यासारख आहे.

         म्हणूनच,आपण सगळ्यांनी निर्धार करूयात.

कोरोनाची लढाई सगळे मिळून लढूयात.कितीही अडचणी,संकटे आली तरी एकमेकांची साथ देऊन एकमेकांना धीर देऊयात.सरकार उपाययोजना करत आहेतच.पण तुम्ही ही या देशाचे नागरिक म्हणून घरातच थांबा.तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.आणि माणूस म्हणून तुमचा धर्म पार पाडायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *